
खुद के लिए कुछ न कुछ करना जरुरी है यारों, पर दुसरों के लिए भी कुछ करो तो सुकून मिलता है !!
जेव्हा ब्लड बँकेमधील रक्तसाठा संपलेला आहे, कोणी परिचित रक्तदाता संपर्कात नाही आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णाकडे वेळ फार कमी आहे… अशावेळी तुम्ही एखाद्या नातेवाईकाला किंवा जवळच्या मित्राला इमर्जन्सी मध्ये रक्तदात्याचा शोध घेतांना कधी पाहिले आहे का ?
किंवा अशी वेळ कधी स्वत:वर आली आहे का?
वेळेवर रक्त किंवा रक्तदाता उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची मनाची होणारी घालमेल आणि हतबलता तुम्ही अनुभवली आहे का ?
आणि त्याच वेळी अथक प्रयत्नांती अथवा अनपेक्षितपणे त्या गरजू रुग्णास कोणीतरी अपरिचित रक्तदाता येऊन रक्त देऊन जातो हा सुखद क्षण तुम्ही कधी अनुभवला आहे का ?
असे दुख:द प्रसंग टाळता यावे यासाठी मदतशील समाज म्हणून आपण काही प्रयत्न करू शकतो का विचारांतून www.save.in या वेबसाईटचा पाया रचला गेला आहे.
सुदैवाने माझ्यावर अशी रक्ताच्या गरजेची वेळ कधी आली नाही परंतु रक्ताची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांचे मित्र वा नातेवाईकांच्या संपर्कात मात्र अनेकदा आलो आहे.
सन 2002 मध्ये माझ्या एका मित्राच्या चिमुकल्या भाचीसाठी आयुष्यात पहिल्यांदा मी रक्तदान केले. त्यावेळी मी केलेल्या मदतीबद्दल मित्राने, त्या चिमुकलीच्या वडिलांनी मानलेले आभार, मित्राच्या बहिणीने पाठीवरून फिरविलेला हात, मी केलेल्या त्या एका छोट्याशा मदतीबद्दल त्यांच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू अन मनातून दिलेले आशीर्वाद… हा पहिलाच आणि खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी !
त्यावेळी ब्लड बँकेतून बाहेर पडतांना मनात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली, रोमरोमांत एक नवचैतन्य निर्माण झाले..जे की अजूनही कायम आहे !
तेव्हापासून ते आजतागायत जिथे गरज असेल आणि मला शक्य होईल त्यावेळी मी रक्तदान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. 2013 पासून माझ्या वाढदिवसापासून रक्तदानाची एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात करून वर्षातून किमान 3 वेळेस न चुकता मी स्वत: रक्तदान तर करतोच पण शक्य होईल तेव्हढ्या मित्रांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करतो. रक्तादानासोबतच मरणोत्तर देहदान, नेत्रदान व अवयवदान करण्यासाठीही चिरपरिचित, नातेवाईक आणि मित्रांना प्रोत्साहित करण्याचा माझा प्रयत्न अखंडपणे सुरु असतो. याचेच फलित म्हणून कित्येक समविचारी परिचित व मित्रांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, सपत्नीक मरणोत्तर देहदान, अवयवदान व नेत्रदानाचे संकल्प करून मला अमूल्य भेट दिलेली आहे.
इतरांना प्रेरित करण्याअगोदर मी स्वत: सपत्नीक मरणोत्तर देहदान, अवयवदान व नेत्रदानाचा रीतसर संकल्प केलेला आहे. त्याबरोबरच मी आजवर 40 पेक्षा अधिक वेळा रक्तदान केलेले आहे.
मागील 10 वर्षांपूर्वी वैयक्तिक पातळीवर सुरु केलेली ही दानाची चळवळ आता थोडी व्यापक करण्याचा प्रयत्न करत आहे. या चळवळीला व्यापकता यावी म्हणूनच save1.in ही वेबसाईट सुरु केली आहे.
Save1 या वेबसाईटच्या माध्यमातून सध्या तरी छत्रपती संभाजीनगर मधील रक्तदात्यांना आणि रक्ताची गरज असलेल्यांना एका सामायिक व्यासपीठावर आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
Save1 रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या रक्तदात्यांचा शोध घेऊन ज्यांना रक्ताची अत्यंत गरज आहे त्यांना वेळेवर मदत पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे.
” तुम्ही स्वतःच्या वा मुलांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर रक्तदान करू शकता, तसेच शुभेच्छांच्या स्वरूपात बुके किंवा इतर काही भेटवस्तू स्विकारण्याऐवजी अशा मित्र वा आप्तेष्टांकडून रक्तदान, मरणोत्तर देहदान, अवयवदान वा नेत्रदानाचा संकल्प करवून घेण्याचा अथवा यापैकी जे शक्य होईल ते त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा स्वरूपात देण्याचा पायंडा नक्कीच पाडू शकता ! “
रक्तदाता (Blood Donor) होण्यासाठी, येथे क्लिक करा.
(रक्तदाता म्हणून नोंदणी करून गरजेवेळी तुम्ही रक्तदान करू शकता)
Volunteer (स्वयंसेवक) होण्यासाठी येथे क्लिक करा.
(रक्तदानासाठी इतरांना प्रवृत्त करून त्यांची नोंदणी तुम्ही करू शकता)
Founder – Save1